Showcasing The Historical Culture, Lifestyle & Royalty Of The Great Holkars
Collection By Milind Dombale (Deshmukh)

Thursday, 23 October 2014

राजमाता अहिल्यादेवी होळकर


राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे स्त्रीशक्तीचा आणि उदात्त मानवी मूल्यांचा सर्वोच्च अविष्कार होय. दि. ३१ मे १७२५ रोजी त्यांचा जन्म चौंडी (जि. नगर) येथील माणकोजी शिंदे या धनगर समाजातील पाटलांच्या घरात झाला. मराठेशाहीचे आधारस्तंभ असलेल्या मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेरावांसोबत वयाच्या ८ व्या वर्षी म्हणजे इ.स. १७३३ साली त्यांचा विवाह झाला. पुत्र मालेराव व कन्या मुक्ताबाई यांच्या रुपाने त्यांची संसारवेल बहरत असतनाच पती खंडेरावांचे कुंभेरीच्या मोहिमेवर असताना निधन झाले अन अहिल्यादेवींना अकाली वैधव्य आले.

पती निधनानंतर सती जाण्याच्या अघोरी प्रथेच्या कालखंडात आणि स्त्री म्हणजे उंबरठ्याच्या आतील मर्यादित वस्तु असा समज असणार्‍या परिस्थितीत अहिल्यादेवींनी अघोरी अंधश्रद्धा आणि कर्तृत्वाच्या आड येणार्‍या सामाजिक बंधनाच्या शृंखला उध्वस्त करुन प्रजाजनांच्या सर्वात्मक कल्याणासाठी अविरत कष्ट केले. म्हणून तर त्या नारीशक्तीच्या उर्जेचे, कर्तृत्वाचे उत्तुंग मापदंड ठरलेल्या आहेत. पती खंडेरावांच्या निधनानंतर आलेले अकाली वैधव्य, एकुलता एक पुत्र मालेरावांचे तसेच जावई यशवंतराव फणसे यांचा मृत्यू. त्यानंतर मुलगी मुक्ताबाईचे सती जाणे, मार्गदर्शक सासरे मल्हारराव होळकर यांचे निधन या सर्व गहिर्‍या दु:खाने या मायमाऊलीच्या काळजाला किती तरी पराकोटीच्या विषडंखी वेदना झाल्या असतील याची कल्पनाही करवत नाही. मात्र दु:खाच्या वणव्यातसुद्धा स्वत:च्या प्रजाहितदक्ष व समाजहितकारी कर्तव्यांना प्राणपणाने जपत या मायमाऊलीने काळालाही लाजवेल असा राज्यकारभार केला. प्रापंचिक सुखाची परमेश्‍वराने सर्वात मोठी शोकांतिका करुनही प्रजेवर सुखांतिका बरसवणारी जगाच्या ज्ञात इतिहासातील एकमेवाद्वितीय राज्यकर्ती म्हणजे अहिल्यादेवीच होय.

लढाया किंवा युद्धे प्रत्यक्ष तलवारीनेच लढली जातात असे नाही तर राजकारणातील चातुर्य आणि मुत्सद्दीपणाने रक्ताचा एकही थेंब वाया न घालवतासुद्धा लढता येतात याचा आदर्शपाठच त्यांनी घालून दिला. सासरे मल्हारराव होळकरांच्या मुशीत त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. ११ डिसेंबर १७६७ रोजी राज्यकारभारावर आरुढ होताना अहिल्यादेवींनी केलेली प्रतिज्ञा म्हणजे प्रजाकल्याणाच्या अंतिम ध्येयाच्या सौंदर्याचा जणू साक्षात वेदच होता,

# माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.
# माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वत: जबाबदार आहे
# सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे
# त्या प्रत्येक कृतीचा जाब मला परमेश्‍वरापुढे देणे आहे.
# परमेश्‍वराने ज्या जबाबदार्‍या माझ्यावर सोपवल्या आहेत,
# त्या मला पार पाडावयाच्या आहेत.

आसेतूहिमाचल पसरलेल्या हिंदुस्थानातील शेकडो देवस्थानांचा त्यांनी उद्धार केला. रस्ते, विहिरी, तलावे, नदीघाट, धर्मशाळा अशी कित्येक लोकोपयोगी कामे त्यांनी केली. अहिल्यादेवींइतकी अमाप संपत्ती तत्कालीन मराठेशाहीत कोणाकडेही नव्हती. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या महादजी शिंदेना तब्बल ३० लाख रुपये कर्जाऊ दिले होते. पेशवाईला त्यांच्याविषयी दरारायुक्त आदर होता. स्वत:च्या खर्चावर मर्यादा घालणार्‍या या मायमाऊलीने जनताजनार्दनाच्या कल्याणासाठी दोन्ही हातांनी अखंड दानधर्म केला.

राष्ट्र आणि समाज घडविणार्‍या महापुरुषांकडे कोणत्या तरी जातीधर्माच्या भिंगातून पाहण्याची घातकवृत्ती सध्याच्या काळात निर्माण होतेय. या महापुरुषांना ठराविक वर्गाचा शिक्का मारुन त्यांना संकुचित चौकटीत बंदिस्त करुन त्यांच्या लोककल्याणकारी कामाकडे दुर्लक्ष्य केले जात आहे. अशा विचित्र परिस्थितीमुळे कित्येक महापुरुषांची व्यक्तिमत्त्वं गुदमरल्यासारखी झालीत. अहिल्यादेवींच्या बाबतीत सुद्धा हेच घडत आहे. अहिल्यादेवींचे कर्तृत्व एखाद्या जातीधर्मापुरते अथवा देशापुरते सीमित राहण्याएवढे नक्कीच मर्यादित नाही. त्यांच्या कर्तृत्वाची दखल भारतीय इतिहासकारांइतकीच पाश्‍चिमात्य इतिहासकारांनीदेखील घेतली आहे. लॉरेन्स या प्रसिद्ध ब्रिटिश ग्रंथकाराने अहिल्यादेवींची तुलना इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ, डेन्मार्कची सम्राज्ञी मार्गारेट व रशियाची राणी क्याथराईन यांच्याशी केली आहे.

सापेक्षी संशोधनासाठी प्रसिद्ध असलेला इतिहासकार अबराय म्याके हा लिहितो, ‘‘सर्व जगाला सन्मार्ग व सुख देण्याकरता निर्माण झालेली अहिल्यादेवी ही सर्वगुणसंपन्न स्त्री परमेश्‍वराची तर अपूर्व देणगीच होती. किंबहुना ती तेजोमय देवताच होती. ही लोकोत्तर स्त्री आपली अपूर्व धर्मशीलता, निस्सीम कार्यशीलता व प्रशंसनीय उद्यमशीलता या सद्गुणांच्या आधारे हिंदुस्थानातीलच नव्हे तर कोणत्याही राष्ट्रातील स्त्रीजातीच्या तेजस्वी रत्नावलीत विराजमान होेण्यासारखी आहे.’’ धर्म हा माणसाच्या आचारविचाराचा अन संस्काराचा जीवनगाभा असून माणसाला अध्यात्मिक अनुभूतीचा स्पर्श विनासायास घडावा म्हणून तर अहिल्यादेवींनी भारतभर रचनात्मक धर्मकार्य केले. जगाच्या इतिहासात अनेक राजसत्तांचा उदयास्त झाला. कित्येक सत्ता तलवारीच्या खडखडाटीने तर काही सत्ता फंदफितुरी व अनन्वित अत्याचाराने गाजल्या. पण स्त्रीशक्तीच्या सर्वोच्च एकखांबी आविष्काराचे सोज्वळ व तितकेच करारी प्रतिबिंब उमटले ते फक्त होळकरशाहीमध्ये.

स्वतंत्र छत्रचामर, स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र सिंहासन धारण करणार्‍या अहिल्यादेवी महाराणी तर होत्याच पण ‘इद न मम:’ या विरक्त वृत्तीने राज्यकारभार करणार्‍या त्या खर्‍या कर्मयोगिनी होत्या. प्रापंचिक जीवन नियतीच्या आभाळात पाचोळ्यासारखे उडून गेल्यावरही सर्वजनांच्या कोटकल्याणाचे ‘सुंबरान’ शिवाकडे मागणार्‍या त्या महान ‘राजमाता’ होत्या. पुण्याचे संचयन स्वत:साठी करणार्‍या ‘मानव’ त्या नक्कीच नव्हत्या तर स्वत:च्या पुण्यसंचयनातून महन्मंगल श्‍लोकांच्या पावित्र्याचा समाज घडविणार्‍या त्या ‘पुण्यश्लोक’ होत्या. अहिल्यादेवी रुढ अर्थाने देवताही नव्हत्या. तुमच्या-आमच्यासारख्या मानवच होत्या. मानुषपणाचे सर्व मनोव्यापार त्यांच्याही बाबतीत घडले पण मध्ययुगीन कालखंडाच्या पार्श्‍वभूमीवर एक स्त्री असतानाही तब्बल २५ वर्षाच्या धुरंधर राज्यकारभारातील त्यांच्या कर्तृत्वाचा लखलखता आलेख पाहून ‘देवत्व’ आणि ‘मनुष्यत्व’ यातील सीमारेषा त्यांच्याबाबतीत पुसट होऊन जातात. अहिल्यादेवींचे चरित्र आणि माजघरातील देव्हारा यांच्यात अद्वैत होऊन जातं…

- श्री. प्रमोद प्रकाश धायगुडे, वाघोशी

No comments:

Post a Comment