Showcasing The Historical Culture, Lifestyle & Royalty Of The Great Holkars
Collection By Milind Dombale (Deshmukh)

Wednesday 9 September 2015

Maharani Tulsabai Holkar (​​महाराणी ​तुळसाबाई होळकर)

महाराजा यशवंतरावांना एकुण दोन अपत्ये झाली. लाडाबाईपासुन भीमाबाई तर मिनाबाईपासुन (काही इतिहासतद्न्यांच्या मते केशरबाईपासुन) मल्हारराव (तिसरे). तुळसाबाईंना अपत्यप्राप्ती झाली नाही. (​​ तुळसाबाई​​ या महानुभाव संप्रदायाच्या व मुळच्या जेजुरी येथील होत्या. हा त्या ​​ काळातील एक अतुलनीय असा आंतरजातीय प्रेमविवाह.) मल्हाररावाला (वय वर्ष ६) होळकरी गादीवर बसवुन त्याच्या तर्फे रिजंट म्हणून महाराणी तुळसाबाई राज्यकारभार पाहु लागल्या. यशवंतरावांच्या मृत्युपासून ते १८१७ पर्यंत यशवंतरावांची दृष्टी ठेवत इंग्रजांना होळकरी राज्यात पाय ठेवू न देण्याची त्यांनी दक्षता घेतली. खरे तर यशवंतरावांच्या मृत्युनंतर होळकरी राज्य आपण सहज गिळून टाकू असे इंग्रजांना वाटले होते. त्यांनी वेगवेगळ्या आमिषांचे प्रस्तावही पाठवले होते. तुळसाबाईंनी त्यांना भीक घातली नाही. इंग्रजांनी मग वेगळी आघाडी उघडली. पण तुळसाबाई कारभार पाहु लागल्यापासुन काही काळानंतर त्यांचा द्वेष करणा-यांची गर्दीही वाढु लागली, कारण माल्कमने त्यांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. काय वाट्टेल ते करुन इंग्रजांना होळकरी राज्य खालसा करणे महत्वाचे वाटत होते.

तुळसाबाईवर करण्यात येणारा पहिला आरोप म्हणजे त्या यशवंतरावांच्या विवाहित पत्नी नव्हत्या. या आरोपाची दखल आपण आधी घेऊयात. ही अन्याबा महानुभाव या जेजुरी येथील गृहस्थाची कन्या होती. ही सुद्धा औरस कि अनौरस यबाबत माल्कमने संशय व्यक्त करुन आपल्या मनोवृत्तीचा परिचय करुन दिला आहे. असो. तुळसाबाई व यशवंतरावांचा परिचय होण्यात शामराव महाडिकांचे अंग होते ही एक दंतकथा तुळसाबाईंबद्दल प्रचलित आहे. १७९९ ते १८०१ या काळात कधीतरी यशवंतराव व तुळसाबाई यांची भेट झाली असावी असा तर्क नरहर फाटक देतात. (श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर) ही भेट उत्तरेत झाली कि खुद्द जेजुरीत याबाबत मात्र माहिती मिळत नसली तरी एकंदरित यशवंतरावांच्या हालचाली पाहता यशवंतरावांच्या पुणे स्वारीच्या दरम्यानच १८०२ मधे ही भेट झाली असेल असे म्हणता येते.

यशवंतरावांची तुळसाबाईंना पाठवलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. मल्हाररावांच्या लग्नानिमित्त तुळसाबाईंच्या नावे पाठवलेल्या दोन कुंकुमपत्रिका प्रसिद्ध असून नरहर फाटक म्हणतात कि उपस्त्रीला (रखेली) विवाहकार्याला निमंत्रण तत्कालीन स्थितीत दिले गेले नसते. अनेक पत्रांतही यशवंतरावांनी तुळसाबाईला "सौभाग्यवती" असे संबोधलेले आहे, त्यामुळे तुळसाबाई या विधीवत यशवंतरावांशी विवाहबद्ध झाल्या होत्या असे स्पष्ट दिसते.

तुळसाबाई स्वभावाने करारी, धैर्यवान व बुद्धीमान होत्या. तसे नसते यशवंतरावांच्या मृत्युनंतर मल्हारावाला मांडीवर बसवून राज्यकारभार त्यांना हाती घेता आला नसता. इंग्रजांच्या संदर्भातील तुळसाबाईंचा पेशव्यांशीही पत्रव्यवहार उपलब्ध असून त्यात त्यांच्या धोरणी राजकारणाचे दर्शन घडते. भीमाबाई व मल्हाररावांची कसलीही त्यांनी आबाळ केली नाही. भीमाबाई आपल्या सावत्र आईच्या राजकारणाला व मुत्सद्देगिरीला साथच देत असे. भीमाबाई व मल्हारराव जातीने​ ​ महिदपुरच्या​ ​ युद्धात उपस्थित होते यावरुन संस्थानाचे हित आपल्या सावत्र आईच्या मार्गदर्शनाखाली जपण्यात ही भावंडे अघाडीवर होते असे दिसते. तुळसाबाई, माल्कम व त्याची री ओढणारे इतिहासकार म्हणतात तशी बदफैली व व्यभिचारी असती तर सलग सात वर्ष तुळसाबाईंना राज्य करता येणे, वर्चस्व टिकवता येणे अशक्य झाले असते.

खरे तर यशवंतरावांचा मृत्यू झाल्यानंतर होळकरी राज्य सहज ताब्यात घेता येईल असा माल्कमचा होरा होता. त्याने त्यासाठी सुरुवातीपासून जी कटकारस्थाने केली त्याला तोड नाही.

मल्हाररावांचा रिजंट म्हणून तुळसाबाईंनी काम पहायला सुरुवात केली तेंव्हा ब्रिटिशांनीही मल्हाररावाचा वारसा मान्य करत पित्याच्या सा-या पदव्या वापरण्याचा अधिकार मान्य केला होता. तुळसाबाईने तात्या जोग, गणपतराव, अमिरखान, गफुरखान आणि जालीमसिंग या जुन्या सेवक तसेच यशवंतरावांच्या राजकीय मित्रांशी चांगले संबंध निर्माण केले. परंतू आपण अमिरखानाने यशवंतरावांशीही कशी छुपी दगाबाजी केली होती हे आधीच्या प्रकरणात पाहिलेच आहे. त्याला टोंकची जहागिरी यशवंतरावांनीच दिली होती. गफुरखान हा त्याचा मेव्हणा व होळकर दरबारातील त्याचा प्रतिनिधी. हा गफुरखान अमिरखानाला होळकर दरबारातील वित्तंबातम्या कळवत असे.

बाळाराम सेठ हा अजुन एक अधिकारी होता. गंगधर येथे त्याने तुळसाबाईला मल्हाररावांसहित थांबण्याचा आग्रह केला. परंतू त्यातील काळेबेरे लक्षात येताच तुळसाबाईंनी त्याला देहदंडाची शिक्षा दिली. आपले बिंग फुटले आहे कि काय या शंकेने गफुरखान व अन्य सरदार अस्वस्थ झाले. याची जानीव होताच तुळसाबाई अलोट येथे मल्हाररावांसह निघून गेल्या. म्हणजे तुळसाबाईंच्या सुरुवातीच्याच काळात त्यंना विश्वासघातांना तोंड द्यावे लागले.

आक्टोबर १८१३ मध्ये लोर्ड हास्टिंग्ज भारतात दाखल झाला. भारतातील स्थितीचा त्याने आढावा घेतला. मराठा राजमंडळातील सरदार पुन्हा एकत्र यायच्या प्रयत्नात आहेत व तुळसाबाईही त्यात सामील आहे हे त्याच्या लक्षात आले. होळकरांचे सैन्य त्याही काळात सर्वांत अधिक प्रबळ होते. बाजीरावावर अन्य सरदारांचा विश्वास नसला तरी पेशवेपदाचा मान होताच. त्यामुळे १ फेब्रुवारी १८१४ च्या पत्रात त्याने लिहिले कि ब्रिटिश साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी मध्य भारतात तातडीने असंतोष चिरडून टाकला पाहिजे. होळकर तसेच अन्य संस्थानिकांच्या सैन्याचा मुख्य आधार म्हणजे पेंढारी. त्यामुळेच ही इंग्रजांनी त्यांच्याहीविरुद्ध कारवाया करण्याचे निर्णय घेतले. पण यात होळकर, शिंदे आणि अमिरखान मोडता घालून मोठ्या प्रमाणावर बंड करतील अशी भितीही त्यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी कटकारस्थानाचाच वापर करायचा निर्णय घेतला व त्यांना एतद्देशिय देशद्रोह्यांनी साथ कशी दिली हे पुढील घटनाक्रमावरुन लक्षात येते.

या घटनाक्रमात तुळसाबाईंनी मराठा राजमंडलात राहुन ब्रिटिशांना विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पेशव्यांच्या दरबारी वकील पाठवून आपल्या तयारीची माहितीही दिली होती. तुळसाबाईला हटवल्याखेरीज होळकरी राज्य इंग्रजांना ताब्यात घेता येणार नव्हते. होळकरांची फौज बलाढ्य होती आणि यशवंतरावांनी ती प्रशिक्षीतही केली होती. त्यामुळे तुळसाबाईविरुद्ध इंग्रजांनी हळूहळू कटकारस्थाने सुरु केली. बदनामी करुनही कोणी बधत नाही म्हटल्यावर त्यांनी तुळसाबाईंचा खून करायचे ठरवले.

धर्मा कुंवर हा यशवंतरावांच्या विश्वासातील कारभारी होता. आधी त्यालाच फितवायचा प्रयत्न झाला, पण धर्मा कुंवरने दाद दिली नाही. मग इंग्रजांनी आपले लक्ष गफुरखानकडे वळवले. गफुरखान हा आमिरखानाचा होळकरांच्या दरबारातील प्रतिनिधी व सक्खा मेव्हना होता. होता. माल्कमने त्याला जाव-याची जागिर देण्याच्या बदल्यात विकत घेतले (९ नोव्हेंबर १७१७) आणि तुळसाबाई, मल्हारराव व अन्य होळकरी परिवाराला ठार करण्याचे कारस्थान रचले गेले. तुळसाबाई व मल्हारराव (३) ठार झाल्यानंतर झपाट्याने हालचाल करून राज्य गिळंकृत करण्याचे त्यांचे धोरण होते.

त्यानुसार गफुरखानाने संधी साधून तुळसाबाई व मल्हाररावांना अटक केली व त्यांना घेवुन जाव-याकडे निघाला. हत्याकांड होळकरी सीमेच्या बाहेर करावे अशी त्याची योजना असावी. पण यशवंतरावांचा विश्वासु सेनानी धर्मा कुंवरला हे कळताच त्याने गफुरखानाचा पाठलाग सुरु केला. गफुरखान व अमिरखानाशी त्याची लढाईही झाली, पण त्यात धर्माचा पराभव झाला. धर्माला शिरच्छेद करुन ठार मारण्यात आले. पण बोभाटा झाल्याने चित्र असे उभे केले गेले कि जणु धर्मानेच तुळसाबाई व मल्हाररावाला अटक केली होती व गफुरखानानेच त्यांना सोडवले. हा बेत फसल्याने हत्याकांडाची योजना त्यांना थोडी पुढे ढकलावी लागली. माल्कमने होळकरांनी ब्रिटिशांशी शिंद्यांनी केला तसाच ब्रिटिश सार्वभौमत्वाचा करार करावा असा लकडा लावला. तुळसाबाईंनी त्याला भिक घातली नाही.

मेजर माल्कम २६ नोव्हेंबर १८१७ रोजी तालेन येथे आपले सैन्य घेऊन आला. युद्ध करायचे आधीच ठरलेले होते. खुनाचा एक प्रयत्न फसला होता. नवी योजना आखण्याची गरज होती.  दरम्यान इंग्रजांच्या हालचालींची खबर लागल्याने तुळसाबाईंनीही ब्रिटिशांशी युद्धाचा निर्णय घेतला. तात्या जोग, जो ब्रिटिशांशी समझौता करावा या मताचा होता त्याला पदावरुन हाकलुन नजरकैदेत ठेवले. मल्हारराव, भीमाबाई व सर्व सेनानी महिदपुरकडे ससैन्य निघाले होते. गफूरखान तेवढा मागे राहिला होता. त्याचे सैन्य मात्र मल्हाररावांसोबत रवाना झाले होते. या वेळीस होळकरांकडे शंभर तोफा, पंधरा हजार घोडदळ व दहा हजारांचे प्रशिक्षित पायदळ होते.

यामुळे माल्कम पुन्हा तुळसाबाईंशी तह करण्याच्या मागे लागला. १५ डिसेंबर रोजी होळकरांच्या तीन वकिलांशी त्याने वाटाघाटी करायचा निष्फळ प्रयत्न केला. या वाटाघाटीतुन काहीही निष्पन्न होत नाही हे लक्षात आल्यावर नेमके १९ डिसेंबर रोजीच त्यांनी वकिलांची परत रवानगी केली. कारण तुळसाबाई आहे तोवर आपला निभाव लागत नाही हे माल्कमच्या लक्षात आले होतेच आता खात्री पटली. पण दुर्दैवी भाग म्हणजे अमिरखानाने या आधीच, ९ नोव्हेंबर रोजी, इंग्रजांशी तह करुन टाकला होता. माल्कमच्या दृष्टीने ती जमेची बाजु होती. अमिरखानाचा मेव्हणा गफुरखान तर आधीच इंग्रजांना आतून मदत करत होता.

महिदपुरच्या लढाईचा आद्ल्या दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर १७१७ च्या रात्री गफुरखानने डाव साधला. सारे सैन्य, भिमाबाई-मल्हारराव राजधानीत नव्हते. त्याने ही संधी साधली. यासाठीच तो मागे राहिला होता. त्याने महालात अचानक आपली तुकडी घुसवली. तुळसाबाईंना त्यांच्या महालातुन बाहेर काढले, क्षिप्रा नदीच्या काठी नेले व त्यांचा शिरच्छेद करुन त्यांना ठार मारले. त्यांचे प्रेत नदीत फेकुन देण्यात आले. त्यांच्यावर कसलेही अंतिम संस्कार करता आले नाही. हत्याकांड होताच गफुरखान तातडीने महिदपुरच्या दिशेने रवाना झाला.

ब्रिटिशांशी तुळसाबाईलाच तह करायचा होता म्हनून तिला ही गफुरखानाने शिक्षा देण्यात आली असे माल्कमने लिहिले. तो शत्रुच होता. तह करायचा असता तर महिदपुरला सैन्य कशाला पाठवले असते हा प्रश्न आमच्या इतिहासकारांना पडला नाही. सात वर्ष ब्रिटिशांच्या पापी नजरेतून राज्य वाचवले या योग्यतेचे स्मरण केले नाही. वरील घटनाक्रम पाहिला, तुळसाबाईला ठार मारण्याचे दोन अयशस्वी आणि एक यशस्वी प्रयत्न पाहिला तर तुळसाबाई इंग्रजांच्या डोळ्यांत केवढी सलत असेल याची कल्पना येते.

गफुरखानाचे पाप येथेच संपले नाही. तो तुलसाबाईंना ठार मारुन महिदपुरला गेला. २० डिसेंबर रोजी सुरु झालेल्या युद्धात दुपारपर्यंत होळकर जिंकतील असे चित्र असतांना दुपारीच तो अचानक आपले सैन्य घेऊन पळून गेला. त्यामुळे होळकरांचा तेथे पराभव झाला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते. 

यशवंतरावांच्या दुर्दैवी निधनापासून तब्बल सात वर्ष इंग्रजांना होळकरी सीमांपासून दूर ठेवणारी ही मुत्सद्दी महिला. सात वर्ष होळकरी संस्थानाचा घास घ्यायला टपलेल्यांना दूर ठेवणे ही सामान्य बाब नव्हे. पण इतिहासाने महाराणी तुळसाबाईंची यथोचित दखल घेणे तर सोडाच, तिला रखेली, बदफैली ठरवण्याचा प्रयत्न केला. तसे करणे माल्कमच्या किंवा इंग्रजांच्या दृष्टीने स्वाभाविक असले तरी आम्हा पामरांना तरी तुळसाबाईचे महत्व समजायला हवे होते. "नाही चिरा नाही पणती" अशे अवस्था एका समर्थ महाराणीची झाली. विश्वासघातकी मृत्यू स्विकारावा लागला. इंग्रज मात्र खूष होते...उरलले सुरले होळकरी सामर्थ्य नष्ट करण्यात ते यशस्वी होत आले होते. पण सरळ मार्गाने त्यांना अजुनही विजय मिळवण्याची खात्री नव्हती. पण त्यांचे नशीब थोर एवढे कि गफुरखानासारखे घरभेदी त्यांना मिळतच चालले होते.

आणि नीतिहीन लोलुपांची कमी कधी असते काय?

-​ संजय सोनवणी ​

No comments:

Post a Comment